



समर्थ रामदास स्वामींनी जन्मदात्रीचे वर्णन,
'तुळजापूर ठाकेना। चालली पश्चिमेकडे।
पारघाटी जगन्माता। सद्य येऊनि राहिली॥' असे केलेले आढळते. तेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून रस्त्याने २० कि.मी. आणि प्रतापगडापासून ३ कि.मी अंतरावर रस्त्यालगतच्या फाटयापासून ४ कि.मी अंतरावर वसलेले श्रीक्षेत्र पार्वतीपूर म्हणजेच पारसोंड येथील श्रीरामवरदायिनी मंदिर होय. सद्या येथे नवरात्रौत्सवानिमित्त असंख्य भाविकांची रेलचेल आहे. शुक्रवारी दूर्गाष्टमीनिमित्त येथे श्रीपितांबरी चक्रपूजा, श्रीपितांबरी याग, विशेष आरती, गोंधळ आणि अलिबागच्या आमदार मिनाक्षीताई पाटील यांच्यासौजन्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.केव्हातरी समर्थ रामदासांनी तुळजापूरहून देवीची मूर्ती शोधून पारघाटी आणली. ती मुर्ती पारसोंड येथून चार कि.मी. अंतरावरील मेट या दूर्गम जंगलाच्या ठिकाणी ठेवली. याबाबत,
'रामवरदायिनी माता। दास धुंडूनी आणली।
ओळखी पाडिता ठायी। भिन्न भेद असेचिना॥'
असा उल्लेख आढळून येतो. याचा पूर्वेतिहास पाहता, छ.शिवरायांनी जावळीचे राज्य ताब्यात घेतल्यानंतर समोरचा भोरप्याचा डोंगर त्यांच्या दृष्टीस आला आणि त्यांनी मिळालेली जावळीतील सर्व संपत्ती या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी खर्च करण्यासाठी वापरण्याचे ठरविले.१६५६ साली या कामास सुरूवात होऊन १६५८ साली भव्य किल्ला उभारण्यात आला. मात्र, यानंतर मराठेशाहीवर अफजलखानाचे दृष्टचक्र आले आणि त्याने वाटेत येताना तुळजापूरचे भवानी मंदिर फोडून टाकले. पोलादपूर येथे मठ असलेले कवींद्र परमानंद यांच्या शिवभारतात तुळजापूरच्या भवानीमातेचा उल्लेख असून त्यात खानाने देवीचा अवमान केल्याचा निर्देशही आहे. दूस-या निर्देशात कवींद्र परमानंदांनी,
'इदा निमन्पी दैत्यरे। विमुच्या तुळजापूरम्।
उदेता स्मिता जानी ही। सहाय्या येवं ते स्वयंम्।
यथा जाते नं कंसेन। यथा हमवसा निता।
पूर्व तथा धुनै ते नाप्याव। ज्ञातास्मी पाप्यमा॥'
असे म्हणजेच देवीने शिवरायांना दर्शन देऊन सांगितले की, सध्या मी तुझ्या सहाय्यासाठी तुळजापूर सोडून जवळ आले आहे असे समज, पूर्वी जसा मूर्ख कंसाने तसा (सध्या या पाप्याने) माझा अवमान केला आहे. यावरूनच तुळजाभवानी मातेच्या कृपेनेच अफजलखानाचा वध करून महाराजांची किर्ती आसमंतात उजळून निघाली. चारी यवनी शाह्यांना धास्ती बसली.पुराणसंदर्भांचा उल्लेख सांगताना पुजारी शंकर बाबू शिंदे यांनी माहिती दिली की, भगवान शंकर हे माता पार्वतीसोबत असतानाही ध्यानस्थ बसत असल्याने माता पार्वतीने महादेवा, आपणापेक्षा श्रेष्ठ कोण, ज्यांचा जप आपण करता, असा प्रश्न केला. त्यावर महादेवांनी आपण प्रभू रामचंद्रांची भक्ती करीत असल्याचे सांगितले. सीतामाईचे रावणाने हरण केल्याने एकवचनी रामचंद्रांनी डोळे बंद करून अन्य कोणतीही स्त्री नजरेत येऊ नये, यासाठी डोळे बंद करून आत्माराम झाले आहेत. ते याद्वारे आपले मार्गाक्रमण करीत आहेत. हे सांगितल्यानंतर पार्वतीमातेने रामचंद्रांची परिक्षा घेण्याचे ठरवून तिने सीतामाईचे रूप धारण केले आणि रामचंद्रांनी मात्र तिच्याकडे दूर्लक्ष केले. यामुळे पार्वतीमातेला प्रकट व्हावे लागले. प्रभू रामचंद्रांनी पार्वतीमातेला ओळखून तिची पूजा केली आणि पार्वतीने रावणाचा संहार करून तु सीतेला परत मिळवशील असा वर दिला ते ठिकाण तुळजापूरला आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे. पण ते खरे नाही कारण रामचंद्रांना वरदान दिले ते स्थान पार आहे, असे सांगितले. सोंडकर व शिंदे यांच्याकडे परंपरागत पूजेचा कार्यक्रम असतो. विजापूर, निझाम आणि सिद्दी या तीनही यवनी शाह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातील ही बाजारपेठ असल्याने येथे मोठी आर्थिक उलाढाल होत असे. त्याकाळी ७०० ते १००० घरांचे हे गांव आता केवळ शेकड्यावर घरे असल्याचेही पुजारी शंकर शिंदे सांगतात. देवस्थान जागृत आहे आणि चिपळूणचे तत्कालीन आमदार राजाराम शिंदे यांनीही दसपटी दादर येथे श्रीरामवरदायिनी मंदिराचे प्रतिमंदिर करण्याचे प्रयत्न यशस्वी केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मंदिराच्या आवारात मानाई, बगाड, सिंह, हेमाडपंथी रचना, नागांचे शिल्प, भव्य दिपमाळा, मंदिरावर कळस, भक्त निवासमंदिर, केदारेश्वराचे मंदिर, देवीच्या सिंहासनास चांदीचा मुलामा आदी कामे करण्यात आली आहेत.पार येथे श्रीरामवरदायिनी देवीच्या यात्रेचा सोहळा चैत्र आमावस्येला सुरू होऊन वैशाख षष्ठीला संपतो, असेही त्यांनी सांगितले.देवीचा वार गुरूवार असल्याने जशी गर्दी होती तशीच शुक्रवारी दूर्गाष्टमीनिमित्त मोठया संख्येने भाविकांचा पूर येथे लोटल्याने पार्वतीपूर म्हणजेच पारसोंडचे ग्रामस्थ भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज राहिले.
शैलेश पालकर, पोलादपूर 9226849185
can i have aarati for devi ramvardayeeni
ReplyDeleteHya sundar mahiti baddal mahapasun dhanyavaad !
ReplyDelete